पिंपरी : च-होली येथील दाभाडे सरकार चौकात अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तडीपार गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून नऊ किलो ४७८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. भरत दशरथ वाघमारे (वय ३९, दौंड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, गणेश कर्पे, विजय दौंडकर व निखिल वर्पे, रमेश कारके हे दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील च-होली बुद्रुक परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दाभाडे सरकार चौकाजवळ एक व्यक्ती दुचाकीवर पांढरे हिरवे रंगाचे नायलॉनचे पोते ठेऊन संशयीतरीत्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्याला पिंपर- चिंचवड पोलिसांनी तडीपार केले असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीवर असेलेल्या पोत्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी नऊ किलो ४७८ ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण पाच लाख ३३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी भरत वाघमारे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये दोन आणि खडक पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.