पिंपरी : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट पारपत्र बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींनी १२५ लोकांकडून पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्र बनविले असून त्यासाठी पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय प्रताप सिंग (वय ४४), किसन देव पांडे (वय ३५, दोघे रा. मामुर्डी, मूळ – उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (वय ३८, रा. किवळे, मूळ – गवळेनगर, धुळे), किरण अर्जुन राऊत (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मनीष कन्हैयालाल स्वामी (वय ३२, रा. राजस्थान) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये भाजप ‘राष्ट्रवादी’त श्रेयवादाची लढाई, विकासकामांचे उद्घाटन करण्यावरून वाद

आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी आयात-निर्यात व्यवसायात काम करत होते. त्यांनी लोकांच्या फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली. भारतातून परदेशात जाणारे वेल्डर, वाहनचालक, प्लंबर यांना पारपत्र देण्यासाठी ‘ब्ल्यू ओसियन मरीन’ या नावाने कंपनी सुरू केली. लोकांकडून पारपत्र काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे. पारपत्र काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पारपत्र घेतले जात होते.

विश्वास संपादन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात असे. त्यानुसार, नागरिकांकडून कागदपत्रे आल्यानंतर पारपत्रावर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना खरे पारपत्र असल्याचे भासवून दिले जात असे. काहीजण ब्रुनेई देशात जाण्यासाठी पारपत्र घेऊन विमानतळावर गेले असता तिथे हे शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही लोकांनी दिल्ली येथील ब्रुनेई देशाच्या दुतावासात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी त्यांच्या पारपत्रावर बनावट शिक्के मारल्याची खात्री झाली.

हेही वाचा…VIDEO : “हल्लेखोरांनी दगड-काठ्यांनी मारलं, महिलांना लाथा…”, रोहित पवारांनी सांगितलं पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमावेळी काय घडलं

बनावट शिक्के बनवून देणाराही अटकेत

आरोपींनी चिखलीतील युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स या दुकानातून बनावट शिक्के तयार करून घेतले होते. पोलिसांनी दुकानदार किरण राऊत याला देखील अटक केली. त्याने दुकानावर ‘या बसा शिक्के घेऊनच जा’ अशा प्रकारची जाहिरात केली होती. पैशांच्या लालसेपोटी किरण याने हे बनावट शिक्के तयार करून दिले असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून शिक्के बनविण्याची मशिन असा ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विजयप्रतापने मामुर्डी येथील शिरीष आनंद वानखेडे या लाँड्री चालकाकडे महत्त्वाची कागदपत्रे म्हणून ५८ पारपत्र ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी त्या लाँड्री चालवणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी करत तिथून ५८ पारपत्र जप्त केले. एकूण १२५ पारपत्र जप्त करण्यात आली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri a gang making fake passports was arrested by hinjewadi police pune print news ggy 03 psg