पिंपरी : तळेगांव दाभाडे एमआयडीसीत येणारी वेदांत फॉक्सकाॅन कंपनी खोके सरकारने गुजरातला पाठविली. त्यामुळे हजारो तरुणांचा रोजगार हिरावला आहे. राज्यकर्ते सर्व उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. महाराष्ट्रावर अन्याय करण्याचे कलम राज्य घटनेत टाकले आहे का? घटनाबाह्य खोके सरकार पुन्हा डोक्यावर बसले तर मंत्रालय, तहसील कार्यालयही गुजरातला नेतील, असा हल्ला माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. गद्दारी करणाऱ्यातील एकजणही लोकसभा, विधानसभेची पायरी चढू शकणार नाही. पेपर फोडणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्याबाबतचा कायदा करण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे हे रविवारी मावळ दौऱ्यावर असून त्यांचे शिवसैनिकांनी लोणावळ्यात जंगी स्वागत केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची तळेगावदाभाडे येथे स्वागत सभा झाली. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळचे संघटक संजोग वाघेरे, तळेगावचे शहरप्रमुख शंकर भेगडे यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ.शैलेश मोहिते-पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
हेही वाचा : पुणे : अजित पवारांना ठाकरे गटाचा दे धक्का; आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बांधले शिवबंधन
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. पुढची विजयाची सभा होईल अशी खात्री असल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, हुडी, मास्क घालून शिवसेनेसोबत गद्दारी झाली. माथेवर गद्दारीचा शिक्का आहे. घटनाबाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसले आहेत. गद्दारी करणाऱ्यातील एकजणही लोकसभा, विधानसभेची पायरी चढू शकणार नाही. भ्रष्ट्राचाराचे आरोप करायचे आणि भाजपमध्ये आले की वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतात. राज्यातील जनता त्रस्त आहेत.
महाराष्ट्रातील उद्योजक शेजारील राज्यात जात आहेत. जनरल मोटर्सच्या कामगाराचे उपोषण सुरू आहे. त्यांच्याकडे कोणी बघत नाही, भेटत नाही. मराठा, ओबीसी समाजाचा आरक्षणासाठी आक्रोश सुरू आहे. उद्योग गुजरातला जात असल्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे, त्यामुळे खरे कोण देशद्रोही आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस आणि जिमचा काही संबंध नाही”, आदित्य ठाकरेंचा फडणवीस यांना टोला
सचिन अहिर म्हणाले की, काहींचा गैरसमज आहे की पक्षाच्या नव्हे वैयक्तिक जिवावर निवडून आलो आहे. हिंमत असेल तर आता मिळालेल्या चिन्हावर निवडणूक लढायला या, आमचा उमेदवार तुम्हाला चितपट करेल. निष्ठेची भाषा करणाऱ्यांनी गद्दारी केली. पक्षाने पाहिजे ते दिले, पण तुम्ही गद्दारी केली. चक्रव्यूहाच्या विरोधात जात उद्धव ठाकरे लढा देत आहेत. ठाकरे यांना राज्यातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरकार कामगार, शेतकरी विरोधी आहे. संजोग वाघेरे म्हणाले की, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.