पिंपरी : हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे, असे भाजपला उद्देशून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे. ते पुण्याच्या तळेगाव येथे स्वागत सभेत बोलत होते. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत, असं वक्तव्य करत त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे हे आज मावळ, पिंपरी- चिंचवड आणि पुणे दौऱ्यावर आहेत. एक प्रकारे ते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करत असल्याचं बोललं जातं आहे.
हेही वाचा : “अगदी कोणाच्या स्वीय सहाय्यकांवरही विश्वास ठेवू नका, नाही तर…”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
वेदांता फॉक्सकॉनसह १६० कंपन्या महाराष्ट्रात येणार होत्या. मात्र, त्याअगोदर कंपन्या परराज्यात पळवण्यात आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार गेला. लाखो तरुण हे बेरोजगार झाले आहेत. अस घडलं नसतं, काहींनी गद्दारी केली. ही गद्दारी म्हणजे देशाशी बेईमानी आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले, पुढे ते म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही. त्यांनी करार रद्द केला आहे. कारण तिथं कंपनी उभारण्यासाठी सात वर्षे लागणार होते. त्यामुळं त्यांनी देशातून हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे भले करण्याच्या नादात देशाचे नुकसान झाले आहे. मग, खरा देशद्रोही कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला जातो आहे. पुढे ते म्हणाले, २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे, असं ठाकरे म्हणाले.