पिंपरी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’ राबविले असून, समाजातील विविध स्तरातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे आमदार प्रसाद लाड, उद्योजक विजय जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह अनेकांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे.
आज सर्वच रस्त्यांवर थुंकून रस्ते घाण झालेले पहावयास मिळतात. हे चित्र समाजिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. म्हणून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने आमच्या प्रशालेचे विद्यार्थी रस्त्यावर कुणी थुंकताना दिसले तर या लोकांना ‘रस्त्यावर थुंकू नका’, असे सांगतील. मात्र, तरीही त्या व्यक्तीने ऐकले नाही, तर विद्यार्थी आजूबाजूच्या लोकांना रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीविषयी तक्रार करतील. जेणेकरून रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला संकोचल्यासारखे होईल.
हेही वाचा : बोपदेव घाटात तरुणीवर बलात्कार; दोघांविरुद्ध गुन्हा
अशाप्रकारे हे अभियान कायमस्वरूपी चालणार आहे. हे अभियान ‘थुंकी मुक्त रस्ता’ चळवळ होण्यासाठी इतर शाळा, महाविद्यालये, नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशाळेच्या या अभियानाला पाठिंबा द्यावा असे आवाहन आरती राव यांनी केले. रस्त्यावर थुंकणाऱ्यांनीही आपल्यामुळे रस्ते विद्रुप होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या, तसेच आपल्या चपलांच्या माध्यमातून ही थुंकी घरापर्यंत येऊन पोहोचते. त्यामुळे आपल्याच कुटुंबाचे आरोग्य बिघडते. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांनी ‘थुंकीमुक्त रस्ते’ कसे होतील, या दृष्टीने जनजागृती करायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा : चांदणी चौकाबाबत आणखी एक मोठा निर्णय; रस्ता ओलांडण्यासाठी उभारणार पादचारी पूल
‘विद्यार्थ्यांनी राबविलेले ‘थुंकीमुक्त रस्ता अभियान’ ही आजच्या समाजाची गरज आहे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. जर तुम्हाला कुणी रस्त्यावर थुंकताना दिसलं, तर कृपया रस्त्यावर थुंकू नका, असे आवाहन त्यांना करा. सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा’, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. तर ‘थुंकीमुक्त रस्ते अभियानातून खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत, सुंदर भारत, निरोगी भारत निर्माण होण्यास मदत होणार आहे. राज्यभरातील शाळांनी या अभियानात सहभाग घ्यायला हवा’, असे आवाहन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.