पिंपरी : वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला भरधाव चारचाकी वाहनाने उडवले. यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राहुल मोटे (वय ३०) असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. प्रशांत संतोष कदम (वय २० रा. निरगुडी, हवेली) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पोपटराव टेमगिरे (वय ३९) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस शिपाई मोटे हे दिघी आळंदी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. चऱ्होली गावातून अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी ते सहकारी पोलिसांसह वाहतूक नियमन करत होते.

हेही वाचा : पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट

दुपारच्या सुमारास चऱ्होली गावाकडून आरोपी प्रशांत चारचाकी वाहन भरधाव वेगात घेऊन आला. या वाहनाला काळ्या काचा होत्या. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांत याने वाहन दामटले. त्यामुळे पोलीस शिपाई मोटे यांनी पुढे होऊन वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने भरधाव चारचाकी मोटे यांच्या अंगावर घातली. यात मोटे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, खांद्याला, पायाला मार लागला असून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader