लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३१० झाडे बाधित होणार आहेत. त्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर, पुनर्रोपण केलेले एकही झाड जगत नाही. त्यामुळे महापालिकेने झाडे वाचवून नदी सुधार प्रकल्प राबवावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी ४४.४० किलोमीटर इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे १४.२० किलोमीटर इतकी आहे. महापालिका हद्दीतून धावणाऱ्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम हाती घेतले जाणार आहे. वाकड बायपास ते स्पायसर कॉलेज-सांगवी पूल असे ८.८० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी २७६ कोटी ५४ लाख रुपये खर्च होणार आहे.

आणखी वाचा-पुणे: पीएमपी बसला धडकून मोटारसायकलस्वार तरुणचा मृत्यु

नदी काठावर अनेक जुनी, दुर्मीळ झाडे आणि वनस्पती आहेत. सर्व झाडांची गणना करण्यात आली असून विविध जातीची एक हजार लहान-मोठी झाडे असल्याचे स्पष्ट झाले. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामामुळे ३१० झाडे बाधित होत आहेत. त्या झाडांचे नदी काठावरच पुनर्रोपण केले जाईल. या प्रकल्पासाठी दोन हजार ७०० नवीन देशी जातीच्या झाडांची लागवड केली जाणार असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी २५० कोटींचा खर्च

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा दुसरा टप्पा सांगवी ते बोपखेल असा ५.४० किलोमीटर अंतरावर राबविला जाणार आहे. त्यात दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) २.५० किलोमीटरचे क्षेत्र आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे वृक्षतोड होत आहे. परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडली जातात. याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आता नदी सुधारच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जाणार आहे. पुनर्रोपण केलेले एकही झाड जगत नाही. महापालिकेने झाडे वाचवून नदी सुधार प्रकल्प राबवावा. पुनर्रोपण करण्याच्या नावाखाली झाडे काढण्यास आमचा तीव्र विरोध आहे. झाडे काढल्यास आंदोलन करण्यात येईल. -मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३१० झाडे बाधित होत आहेत. त्यापैकी शक्य तेवढ्या झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. त्याशिवाय देशी झाडांची लागवड केली जाईल. -संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका