पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयात मागील तीन वर्षांत ९५ हजार ९३२ महिलांची प्रसूती झाली. त्यामध्ये ५१ मातामृत्यू झाले आहेत. त्यात ४८ महापालिका हद्दीतील आहेत.पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतील रुग्ण महापालिकेच्या वायसीएमसह आठ रुग्णालयांंत उपचार घेण्यासाठी येतात. आर्थिक दुर्बल घटकासह सर्वसामान्य रुग्णांसाठी महापालिकेची रुग्णालये वरदान ठरत आहेत.

बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दहा हजार रुग्ण उपचार घेतात. वर्षभरात १२ ते १३ लाख रुग्ण उपचार घेतात. शहरातील महापालिकेच्या वायसीएम, जिजामाता, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, तालेरा, यमुनानगर, सांगवी येथील रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची सुविधा आहे. शहरातील खासगी आणि महापालिका रुग्णालयात २०२२-२३ मध्ये ३४ हजार ७९६, २०२३-२४ मध्ये २८ हजार ६९, तर २०२४-२५ मध्ये ३३ हजार ६७ प्रसूती झाल्या आहेत. त्यामध्ये ५१ मातामृत्यू झाले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता मनतोडे म्हणाल्या, ‘महिलांची प्रसूती दोन प्रकारांनी होते. एक म्हणजे सर्वसाधारण आणि दुसरी सिझेरिअन. सिझेरिअनचा पर्याय तेव्हा वापरला जातो जेव्हा आई किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण होणे, बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होणे, रक्तदाब वाढणे, नाळ गळ्याभोवती असणे किंवा गर्भ पिशवीतील पाणी कमी होणे, अशा विविध कारणांनी सिझेरिअन प्रसूती केली जाते.’

मातामृत्यूची कारणे गुंतागुंत, रुग्णालयात दाखल होण्यास हाेणारा विलंब, जाेखमीची प्रसूती, अति रक्तस्राव, सहव्याधी, आनुवंशिक आजारांचा इतिहास, प्रसूतिकाळात संसर्ग हाेणे.

महिलांची बदललेली जीवनशैली, गर्भवतीला वेळेवर रुग्णालयात दाखल केले जात नाही. गतवर्षी शहरात ३३ हजार ६७ गर्भवतींची प्रसूती झाली. त्यामध्ये २३ मातांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक महिलेच्या मृत्यूनंतर लेखापरीक्षण केले जाते. माता मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. डॉ. लक्ष्मण गाेफणे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका