पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र याच बालेकिल्ल्यातून आता अजित पवारांना एक- एक धक्का बसत असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तसा इशारा दिला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली असून महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने ते अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार घेत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. याबाबत मी संजोग वाघेरे सोबत लवकर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुठल्या पक्षात जायचे आणि कुठल्या पक्षात थांबायचे यासाठी व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य असल्याचे देखील अजित पवारांनी म्हटले आहे. ते सोमवारी पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर ठाकरे गटात? संजोग वाघेरे, उद्धव ठाकरे भेटीमुळे अजित पवारांना धक्का, उपमुख्यमंत्री म्हणाले…

अजित पवार म्हणाले, राजकारणात कोण कोणाच्या भेटी घेतो हे राजकारणात पहिल्यापासूनच आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षातून उमेदवारी कोणाला मिळेल याची चाचपणी एखाद्याने केली असेल. काही जणांना खासदार व्हायचं आहे. या पक्षात तिकीट नाही मिळालं तर त्या पक्षात तिकीट मिळेल का? या हेतूने काही जण गेले असतील. माझं त्यांच्यासोबत काही संभाषण झालेलं नाही. संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो मी एकत्र बघितलेला आहे. संजोग वाघेरे सोबत याबाबत मी चर्चा करणार आहे. प्रत्येकाला व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने ते आता अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार घेत आहेत. असा टोला अजित पवारांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad ajit pawar statement on sanjog waghere and uddhav thackeray meeting kjp 91 css
Show comments