पिंपरी- चिंचवड: हत्या आणि घरफोडी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवडच्या निगडी पोलिसांनी पुण्याच्या हडपसर येथून अटक केली आहे. आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी याच्यावर खुनाचा प्रयत्न, खून, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे ९० गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडणं अत्यंत आव्हानात्मक होतं. निगडी येथील ज्वेलरी शॉप फोडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध निगडी पोलीस घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
आरोपीकडून १० तोळे सोन्याचे दागिने, ८ किलो चांदी आणि दोन तलवारी असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अब्दुल शेख या सोनाराला देखील पोलिसांनी अटक केली. आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने शेखला विकले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील निगडित असलेलं श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाच्या दुकानात आरोपी विकीसिंग याने तीन साथीदारांसह चोरी केली होती. तिजोरी फोडून ३० तोळे सोन्याचे दागिने, १० किलो चांदीचे दागिने आणि १८ हजार रोख रक्कम चोरली होती. यानंतर त्याने दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील घेऊन साथीदारांसह फरार झाला होता. निगडी पोलीस ठाण्यात घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : पिंपरी : महापालिकेचा ‘डीबीटी’ला हरताळ!
निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूच्या सीसीटीव्ही तपासल्यानंतर लाल रंगाची गाडी आणि आरोपी दिसून आले. पिंपरी- चिंचवड शहर आणि पुणे शहरातील २५० ते ३०० सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. सीसीटीव्ही वरून घरफोड्या करणारा कुख्यात विक्कीसिंग पर्यंत निगडी पोलीस पोहचले. विकीसिंगला पकडणं आव्हानात्मक असल्याने पोलीस उपनिरीक्षक अमरीश देशमुख यांच्यासह इतर टीमने विकीसिंगच्या घराला वेढा घातला, त्याला घेरलं, मग त्याच्या घरात जाऊन झोपेत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
गुन्ह्यात अटक केल्यानंतर तपासात त्याने ज्वेलरी शॉप फोडल्याचं कबूल केलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील बिबवेवाडीत बंद फ्लॅट फोडल्याचं देखील समोर आलेलं आहे. तसेच डोंबिवली या ठिकाणी चार चाकी वाहन चोरल्याचं समोर आलं असून असे तीन गुन्हे निष्पन्न झाले आहेत. दरम्यान, ज्वेलरी शॉप फोडल्यानंतर सोन्याचे दागिने अब्दुल शेख या सोनाराला विकले होते. त्याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सोनाराकडून ८ किलो चांदी, १० तोळे सोन्याचे दागिने, दोन तलवारी असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.