पिंपरी : जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा दंडुका उगारला आहे. मोशीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून ७० हजार रुपयांचा तर डेंग्यू अळ्या आढळल्याबद्दल एका व्यावसायिकाकडून दहा हजार रुपये असा ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात ३२ दवाखाने, तर आठ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमधील जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. पण, खासगी रुग्णालयांकडून जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जात नाही. चिखली, मोशी परिसरातील खासगी रुग्णालयांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो. रात्रीच्या वेळी हा कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो.
हेही वाचा – पिंपरी : महापालिका थेरगावमध्ये ‘पीपीपी’ तत्वावर उभारणार कॅन्सर रुग्णालय
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडसाठी पुनावळेत कचरा भूमी होणारच; महापालिका आयुक्तांनी घेतली ‘ही’ भूमिका
मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकणाऱ्या दोघांवर सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने कारवाई केली. दोन वैद्यकीय व्यावसायिकांना प्रत्येकी ३५ हजार प्रमाणे ७० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन बोदडे यांनी केले.