पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहर भाजपने भिंतीचा आधार घेतला आहे. चिंचवड येथील एका भिंतीवरील ‘अबकी बार ४०० पार’ असा मजकूर असलेल्या जाहिरातीला काळे फासल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर भाजपच्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या कामांची माहिती विविध माध्यमांतून जनतेला दिली जात आहे. त्यासाठी भिंतीचाही आधार घेतला आहे. ‘पुन्हा एकदा भाजप सरकार’, ‘अब की बार ४०० पार’ असा मजकूर लिहीत आणि कमळ चिन्हासह शहराच्या विविध भागांतील भिंती रंगविण्यात आल्या आहेत. चिंचवड, केशवनगर येथील गणेश विसर्जन घाटाजवळ एका गृहनिर्माण संस्थेच्या भिंतीवर पक्षाचे चिन्ह, ‘अब की बार ४०० पार’ असा मजकूर लिहीत भिंत रंगविण्यात आली. मात्र, कोणी तरी या जाहिरातीवर काळे फासले आहे.
हेही वाचा : ‘माननीय’ नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धनामध्ये साडेपाच कोटींची बचत, पण नेमकी कशी?
तसेच केशवनगर येथील गोयल गरिमा या गृहनिर्माण संस्थेच्या बाहेर रंगविण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातीवरील चिन्हावर महापुरुषाचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच जनतेचा रोष दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.