पिंपरी : शहरातील निगडी, भोसरी आणि चिंचवड येथील रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा इ-मेल आल्याने रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांची एकच धांदल उडाली होती. पोलिसांनी बॉम्ब शोधक नाशक पथकास पाचारण केले. पथकाने संपूर्ण रुग्णालय परिसर पिंजून काढला मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेळ चौकातील एका खासगी रुग्णालयाला मेल आयडीवरून रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा इ-मेल प्राप्त झाला. त्यामुळे रुग्णालयात एकच धावपळ उडाली. रुग्णालय व्यवस्थापनाने याबाबत निगडी पोलिसांना माहिती दिली. निगडी पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णालयात धाव घेतली. तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकास पाचारण केले.
हेही वाचा : Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले; म्हणाले, “नालायकांनो पंधराशे रुपयात…”
बॉम्ब शोधक नाशक पथकाने रुग्णालयाच्या आतील व बाहेरील परिसर पिंजून काढला मात्र, अशी कोणतीही संशयित वस्तू त्यांना मिळून आली नाही. या रुग्णालयाचा परिसर तपासत असताना भोसरीतील एक आणि चिंचवड येथील एका रुग्णालयालाही अशाच प्रकारे इ-मेल प्राप्त झाल्याचे समोर आले. कोणीतरी खोडसाळपणे इ-मेल पाठवल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, कोणताही धोका नको, म्हणून पोलिसांनी चिंचवड आणि भोसरीतील रुग्णालयात धाव घेत तपासणी केली. नेमके मेल कोणी, कशासाठी केले. आलेल्या मेलमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.
© The Indian Express (P) Ltd