पिंपरी : मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व दप्तरामधील नोंदी तपासणीचे काम पूर्ण झाले. महापालिकेने एक लाख ३४ हजार ६०२ नोंदी तपासल्या असून एक हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. याबाबतचा अंतिम अहवाल अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन १९४८ ते १९६७ या आणि सन १९४८ पूर्वीच्या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात आल्या. शिक्षण, कर आकारणी व कर संकलन, वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदी तपासल्या आहेत. वैद्यकीय विभागातील दोन हजार २२२ आणि कर संकलनमधील ११ हजार ९९३ कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही मराठा-कुणबी नोंद आढळून आलेली नाही.
शिक्षण विभागातील सर्वांधिक एक लाख २० हजार ३८७ नोंदी तपासल्या. १९४८ ते १९६७ या कालावधीतील ७७ हजार ७२६ नोंदीची तपासणी केल्यानंतर १९८ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या. तर, १९४८ पूर्वीच्या कालावधीतील शिक्षण विभागातील ४२ हजार ६६१ नोंदी तपासल्या त्यापैकी एक हजार १५३ कुणबी नोंदी आढळल्या. महापालिकेने एक लाख ३४ हजार ६०२ नोंदी तपासल्या असून एक हजार ३५१ कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
हेही वाचा : चीनमध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; मिळाला ‘हा’ पुरस्कार! १५ देशांच्या यादीत भारताचे नाव आणि….
कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?
या कुणबी नोंदी गावनिहाय तयार केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ऑनलाइन नोंद दिसल्यानंतर नक्कल मिळण्यासाठी महापालिकेकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे. नक्कल घेऊन महसूल अधिकाऱ्यांकडे कुणबी दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला मिळणार आहे.
“एक लाख ३४ हजार ६०२ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ३५१ नोंदी आढळल्या. याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यानंतरही विभागाला अभिलेख तपासता येणार आहेत.” – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त व नोडल अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका