पिंपरी- चिंचवड : गृहखात्याने आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. एकट्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २७ जणांचा यात समावेश आहे. तर, नागपूर शहरातून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात तब्बल १९ पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत. त्यामुळं अनेकांच्या राजकीयदृष्ट्या भुवया उंचावल्या आहेत. या बदल्यांमागे राजकीय हस्तक्षेप असल्याची पोलीस आयुक्तालयात चर्चा आहे.
पिंपरी चिंचवड हा अद्यापही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवार हे महायुतीत सहभागी आहेत. असं असलं तरी गृहखाते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. नागपूर शहरातून १९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर येथील १९ पीआय पिंपरी- चिंचवड शहरात आणले आहेत का? असा प्रश्न विचारला जातो आहे. तर, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालतील २७ जण जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे. त्यांनी या बदल्यांबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : पिंपरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे घंटानाद आंदोलन; पोलीस, आंदोलक समोरासमोर
महायुतीत असलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करायचा आहे का? त्या दृष्टीने राजकीय गणिते सुरू आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. आधीच पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी दबक्या आवाजात बोलताना दिसतात. मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी वरिष्ठांवर राजकीय दबाव टाकला जातो आहे. असं पोलीस सूत्र सांगतात. राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी स्थिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची झाली आहे.