पिंपरी चिंचवड : भाजपाने तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडले. नेत्यांवर चौकशीची कारवाई केली. त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण केली. अशा पद्धतीने केंद्रीय आणि राज्यातील तपास आणि चौकशी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष फोडले आहेत, असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला. ते लोणावळ्यामध्ये आयोजित काँग्रेस चिंतन शिबिरात बोलत होते. लोणावळ्यामध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या चिंतन शिबिराला उद्या नाना पटोले हे संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी आज पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड : महानगरपालिका शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपने ईडी, सीबीआय, आयकर विभाग या तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रात आणि त्याआधी इतर राज्यांत विधिवत पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडले. नेत्यांवर चौकशीची कारवाई करायची. तुरुंगात डांबून ठेवायचं, दहशत निर्माण करायची. अशा प्रकारे केंद्रीय आणि राज्यातील चौकशी आणि तपास संस्थांचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष फोडायचे, सरकार बदलायचे, आपलं सरकार आणायचं ज्याला ऑपरेशन कमळ असं नाव दिलेलं आहे. या सर्व गैर कृत्यांमध्ये संविधानिक पदावर असलेले राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाला आणि राज्यघटनेला काळिमा फासत ही सर्व कारवाई चालू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.