पिंपरी -चिंचवड: प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि नातेवाईकांसह घराच्या जवळून जाणारा रस्ता पोकलेनने बेकायदेशीरपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज), अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी; देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरामध्ये चैतन्य महाराज वाडेकर हे राहतात. त्यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता बेकायदेशीर खोदला. यावेळी त्यांचे इतर एक नातेवाईक आणि दोन बंधू होते. असं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले आहेत. अखेर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांच्या या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.