पिंपरी : पोलीस आयुक्तालयांतर्गत काळेवाडी, बावधन, दापोडी आणि संत तुकारामनगर या चार नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. या पोलीस ठाण्यांसाठी अधिकारी व अंमलदारांची विविध संवर्गातील ३८६ पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यासाठी २३ कोटी ६५ लाख ९६ हजार ७०४ रुपयांच्या आवर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी आयुक्तालयांतर्गत आता २३ पोलीस ठाणी झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यन्वित झाले. त्यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाले. त्यानंतर रावेत, शिरगाव परंदवडी आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. सध्या १८ पोलीस ठाणी होती. वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, या चारही पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी एक सफाई कामगार बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा : पिंपरी : टाटा मोटर्सच्या कामगारांना ४९ हजारांचा बोनस

पिंपरी, भोसरी, हिंजवडी आणि वाकड या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणणे तसेच गुन्ह्यांच्या तपासाला वेग देण्यासाठी नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्यामुळे पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली असून सायबर पोलीस ठाण्यासह आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाण्यांची संख्या २३ झाली आहे.

सायबर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाले असून या ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची ६० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा हा गुन्हा आहे.

हेही वाचा : जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः उचलून ठेवतात… 

पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

बावधन ठाण्यासाठी अनिल विभुते, काळेवाडी राजेंद्र बहिरट, दापोडी नीलेश वाघमारे आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्यासाठी गोरख कुंभार, गुन्हे सुहास आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad four new police stations approved at kalewadi bavdhan dapodi sant tukaram nagar pune print news ggy 03 css