पिंपरी- चिंचवडमध्ये एक सीसीटीव्ही व्हायरल होत असून महिलेला बळजबरीने घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. महिलेचं अपहरण केलं जात आहे. हे त्या सीसीटीव्हीवरून पाहिलं जाऊ शकतं. हे सर्व प्रकरण कौटुंबिक असून पती आणि पत्नीमधील आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधावरून वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अपहरण केल्यानंतर गाडीतच पीडितेला डांबून ठेवण्यात आलं. तिला भुलीचे दोन- तीन इंजेक्शन ही दिल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं आहे. आता या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आणि तरुणाचे लग्न हे दीड वर्षांपूर्वी पुण्याजवळच झाले. लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच ते दहा दिवसांच्या आतच दोघांचे शारीरिक संबंधावरून वाद सुरू झाले. वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंधाची मागणी पती पीडितेकडे करायचा यावरुनच दोघांचं पटत नव्हतं. या गोष्टीला कंटाळून पीडित आई- वडील नसल्याने सासर सोडून मामाच्या मुलाकडे राहायला गेली. काही दिवस गेल्यानंतर पीडितेला आणि पतीला दोन्हीकडील व्यक्तींनी समजावून सांगितलं. पुन्हा ती पतीसोबत राहण्यास तयार झाली. नको तीच गोष्ट घडत असल्याने पीडिता पुन्हा पतीला सोडून निघून गेली.

हेही वाचा : तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा किती नोंदणी… कधीपर्यंत करता येणार अर्ज?

मामाच्या मुलाकडे काही दिवस राहिल्यानंतर ती मुंबई, घाटकोपर मग दिल्ली असा काही महिने तिचा प्रवास झाला. तोपर्यंत पती तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर ती वाकडमध्ये नोकरी करत असल्याची माहिती सासरच्या व्यक्तींना कळली आणि त्यांनी १९ जून रोजी चारचाकीतून थेट वाकड गाठलं. सासू, पती यांची पीडितेशी चर्चा झाली. त्यांनी घटस्फोटाचे पेपर सोबत आणले होते. सोबत येण्यासाठी सासरचे मंडळी पीडितेला आग्रह करत होते. पीडितेने सोबत जाण्यास नकार दिला. पतीने पीडितेला ओढत बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तिला गाडीत बळजबरीने घेऊन जाण्यात आलं. सोबत ऑफिसच्या मित्राला ही घेतलं.

चारचाकी पिंपरी- चिंचवड शहराच्या बाहेर जाताच तिच्या मित्राला गाडीतून उतरवलं आणि ते पुढे निघून गेले. एक रात्र पिडितेला गाडीत डांबून ठेवलं. वेळोवेळी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितने सुटका करून घेण्यासाठी पती सोबत राहण्याचं नाटक केलं. दोघेही मंदिरात बसले, गप्पा मारल्या. एवढ्या वेळेत तिथल्या स्थानिक तरुणाशी बोलून पोलिसांशी संपर्क साधण्याची विनंती केली आणि हे प्रकरण थेट पोलिसात गेलं.

हेही वाचा : बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम प्रवेशांसाठी मोठा निर्णय… आता काय होणार?

अखेर या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम सुरू असून लैंगिक छळ, वेगवेगळ्या स्थितीत शारीरिक संबंध ठेवण्यावरून त्यांच्यात वाद होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे. सासू, पती आणि नातेवाईक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.