पिंपरी चिंचवड : अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरण, फुलांचा वर्षाव अन् ढोल-ताशांच्या निनादामध्ये चौकाचौकात होणारे स्वागत, फटाक्यांची तुफान आतिषबाजी आणि ‘जय सियाराम’चा गगणभेदी नारा अशा उत्साहाच्या आणि भक्ती-भावाच्या वातावरणात तब्बल ५ लाखांहून अधिक पिंपरी-चिंचवडकर रामभक्तांनी सहभागी होत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रथयात्रा यशस्वी केली. राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली होती. त्याला रामभक्त, हिंदू बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. पिंपरी- चिंचवडमध्येही गेल्या सात दिवसांपासून आमदार लांडगे यांनी विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. निगडी येथील भक्ती- शक्ती चौक येथून रथ यात्रेला सुरूवात झाली. हजारो दुचाकी व चारचाकी, चार विजयरथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डी.जे. ढोल पथक, झांज पथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगा आरती, सनई चौघडे, महाबली हनुमान, कलश यात्रा, आतिषबाजी यांसह हिंदू धर्माबाबत जागृती करण्यासाठी विविध देखावे सादर करण्यात आले.