पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू आहे. त्यांचा पाचवा दिवस हा पुण्यात गेला तर सहाव्या दिवसाची सुरुवात आणि अख्खी रात्र पिंपरी- चिंचवड शहरात गेली आहे. ठिक- ठिकाणी स्वागत होत आहे. मनोज जरांगे यांचं डांगे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ पहाटे चारच्या सुमारास आगमन झालं. सर्व मराठयांनी २६ जानेवारी रोजी मुंबईला यावं असं आवाहन करत गेली दोन दिवस झाले सतत बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. पण, लेकरांसाठी संघर्ष असून हा शेवटच्या टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : जरांगे यांची पदयात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सलग दोन दिवस बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. माझा आवाज पण निघत नाही. तुम्हाला विनंती आहे की, आपल्या लेकरांसाठी हा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आला आहे. मावळातील सर्व मर्द मावळ्यांनी २६ जानेवारीला मुंबईत यावं. आरक्षणाची शर्यत जिंकायची आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लढतो आहोत. आपण सर्व जण एकत्र लढू, समाजाला पाठबळ देण्याची हीच वेळ आहे. तुम्ही सर्व मुंबई ला या. अस आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांची लोणावळ्यात जाहीर सभा होणार असून तिथे ते कोणावर निशाणा साधतात हे बघावं लागेल.