पिंपरी चिंचवड : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ४० दिवसांची मुदत संपली असून ते आजपासून उपोषण करणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या दरम्यानच्या काळात पिंपरी- चिंचवड शहरातील नेत्यांना आणि पुढार्यांना सभा तसेच कार्यक्रम घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाजाच्या बांधवांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
हेही वाचा : पिंपरीत दांडियातील वादातून टोळक्याची दोघांना कोयत्याने मारहाण
यावेळी पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकल मराठा बांधवांकडून साखळी उपोषण केलं जात आहे. मराठा बांधव म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. गेली ४० वर्ष झाले मराठा समाजाची केंद्र आणि राज्य सरकार फसवणूक करत आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. सरकारने टिकणारे उपोषण देऊन मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या थांबवाव्यात. जोपर्यंत जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत, तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार आहोत. दरम्यानच्या काळात शहरातील कुठल्याही नेत्यांना, पुढाऱ्यांना सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.