पिंपरी : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २,५१,१६५ करकक्षेत नसलेल्या मालमत्ता आढळल्या आहेत. यांपैकी २,०३,८९४ मालमत्तांची माेजणी पूर्ण झाली असून, करआकारणीची कार्यवाही सुरू झाली आहे. १,१३,८३१ मालमत्ताधारकांना करआकारणीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. नाेटीस देऊनही कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मालमत्ताधारकांना मागील सहा वर्षांपासून करआकारणी करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात ६,३३,२९४ मालमत्ता नाेंदणीकृत आहेत. शहर दिवसेंदिवस वाढत असताना माेठ्या प्रमाणात नाेंदणी न झालेल्या मालमत्ता असण्याची शक्यता हाेती. याचाच विचार करून महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. या खासगी संस्थेमार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २,५१,१६५ मालमत्ता नाेंदणी नसलेल्या आढळून आल्या आहेत. या सर्व मालमत्ताकर कक्षेत आणण्याची कार्यवाही करसंकलन विभागाकडून सुरू आहे. करआकारणीसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नोटीस, संदेश पाठविण्यात आले आहेत. जे मालमत्ताधारक करआकारणीसाठी नोटीस बजावूनही कागदपत्रे उपलब्ध करून देत नाहीत, त्यांना याबाबत कोणतेही स्वारस्य नाही, असे समजण्यात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार मागील सहा वर्षांपासून संबंधित मालमत्तांना करआकारणी केली जाणार आहे.

हेही वाचा : मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

इमारत, जमीन, सदनिका मालकी हक्काची कागदपत्रे, खरेदीखत, सातबारा उतारा ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याकडील मालमत्ता असल्यास दस्त व संबंधित संस्थेने निर्गमित केलेल्या ताबापत्राची सत्यप्रत, मिळकतीबाबत नोंदणीकृत बक्षीसपत्र, वाटणीपत्र झाले असल्यास त्याची सत्यप्रत, इमारत बांधकाम परवानगीप्राप्त असल्यास मंजूर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व मंजूर नकाशाची प्रत देणे आवश्यक आहे.

२३४ कोटींची थकबाकी

थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे. या मालमत्ताधारकांकडे २३४.३१ कोटींची थकबाकी आहे. जप्ती अधिपत्र सादर केलेल्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्याचा आदेश करसंकलन विभागाने दिले आहेत.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे

नळजोड खंडित करण्याची कारवाई

मालमत्ता जप्तीसोबतच आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळजोड खंडित केले जाणार आहेत. थकीत मालमत्ताकरावर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी तत्काळ कराचा भरणा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्ताधारकांनी करआकारणीसाठी आवश्यक कागदपत्रे सात दिवसांमध्ये विभागीय करसंकलन कार्यालयामध्ये जमा करावीत. नोटीस बजावूनही कागदपत्रे सादर न केल्यास मागील सहा वर्षांपासूनची करआकारणी केली जाणार असल्याचे करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad more than two lakh fifty thousand property owners property tax evasion pune print news ggy 03 css