पिंपरी- चिंचवड : सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाई करत बर्थडे बॉय पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाढदिवस साजरा करणं या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. पोलीस कर्मचारी प्रवीण पाटीलचा वाढदिवस गुरुवारी मध्यरात्री साजरा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आल आहे.

सविस्तर माहिती अशी, सांगवी पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच पोलीस कर्मचारी प्रवीण पाटीलने नियमांचे उल्लंघन करत धुमधडाक्यात पोलीस सहकाऱ्यांसह वाढदिवस साजरा केला. फायर गन, डोक्यावर बड्डेचा ताज असलेला टोप, ड्रोनने केलेलं शूटिंग अगदी चित्रपटाला साजेशा असा वाढदिवस प्रवीण पाटीलने साजरा केला. यानिमित्ताने सर्वसामान्यांना एक न्याय आणि पोलिसांना एक न्याय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

त्यातच हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांसोबत हा वाढदिवस साजरा केल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. या गुन्हेगारांच्या पाठीशी पोलिसच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना न जुमानणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. दादा, भाऊ, भाई चे हे भक्त आहेत, आमच्यावर कारवाई कोण करणार? असाच काहीसा पोलीसांचा अविर्भाव असल्याची चर्चा होती.अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी बर्थडे बॉय प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे असे एकूण चार जणांचं निलंबन करण्यात आल आहे. तसंच सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची उचल बांगडी करत त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे.

Story img Loader