रोहित पवार यांच्या पाठोपाठ आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील पिंपरी- चिंचवडमधील गणेश मंडळाच्या भेटी घेऊन आरती केली. पिंपरी- चिंचवड शहर हे अजित पवार यांचा गड मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यात शरद पवार गटाने ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
हेही वाचा… वाद टाळण्यासाठी अजित पवारांची विसर्जन मिरवणुकीला अनुपस्थिती ?
काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाला शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे हे युवा नेतृत्व मिळालं. तुषार कामठे यांनी पद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवार यांना पिंपरी- चिंचवड शहरात आणून शहरातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांनी बाईक रॅली घेऊन शहरातील राजकीय व्यक्तींना सूचक इशारा दिला. आता शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील पिंपरी- चिंचवड शहराचा दौरा केला असून पहाटे दोन पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळाला त्यांनी भेटी दिली आहेत. त्यामुळे एकीकडे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड वर शरद पवार गटाने ताकद वाढवण्यास सुरुवात केली असून शरद पवार गटाचे नेते देखील पिंपरी-चिंचवडकडे लक्ष ठेवून असल्याचं बघायला मिळत आहे.
हेही वाचा… इटलीच्या अॅना मारा या तरुणीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करत जिंकली पुणेकरांची मने
हेही वाचा… विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते बंद; पालकमंत्र्यांनी केला मेट्रोने प्रवास
ऑक्टोबर महिन्यात शरद पवार यांचा मोठा मेळावा होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी शहरातील समर्थ कॉलनी मित्र मंडळ दळवीनगर, नव तरुण मित्र मंडळ चिंचवडगाव, भाट समाज मित्र मंडळ पिंपरी, सिद्धी आनंद पार्क चिखली, कृष्णा नगर लाईन बॉयज,राजे प्रतिष्ठान, मोरया मित्र मंडळ भोसरी, शिवतेज मित्र मंडळ दिघी, मित्र सहकार्य तरुण मंडळ, साधू वासवाणी मंडळ, नानापेठ तरुण मंडळ पिंपरी आदी गणेश मंडळांना भेटी दिल्या.