पिंपरी- चिंचवड : शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा बसला आहे. थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणी पवना नदीला बर्फाळ प्रदेशाचे स्वरूप आले आहे. अवघी नदी फेसाळलेल्या स्वरूपात दिसत आहे. ही पवना नदी नव्हे तर हिमालयातील बर्फाळ नदी असल्याचा भास काही क्षण होतो. वारंवार महानगरपालिकेकडे सामाजिक संस्थांनी तक्रार करून देखील यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
हेही वाचा : पिंपरी : महामार्गांवरील पोलीस गस्त वाढवली; मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
जल प्रदूषण हा मोठा विषय असून सर्वसामान्यांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी ही आधी जलपर्णीमुळे तर आता फेसाळलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे चर्चेत आलेली आहे. थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणाहून वाहणाऱ्या पाण्यात फेसाळलेलं पाणी दिसत असून पवना नदीचे पात्र फेसाने आच्छादले आहे. बर्फाळ प्रदेशात ज्याप्रमाणे नद्या वाहतात त्याचप्रमाणे पवना नदी दिसत आहे. अगदी काही क्षण ही बर्फाळ प्रदेशातील नदी तर नाही ना? असा भास होतो. परंतु, बंधाऱ्यावरून नदीत कोसळणारे पाणी ही पवना नदीच असल्याचे ठणकावून सांगते. पवना नदीची ही स्थिती कोणामुळे झाली? याला कोण जबाबदार आहे? याचे मात्र उत्तर अनुत्तरीत असून पिंपरी- चिंचवड महानगरपालिका केवळ मलिदा असलेल्या प्रकरणाकडे जास्त लक्ष देते हे बहुचर्चित आहे.