पिंपरी चिंचवड : एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे. संसार आणि अभ्यास अशी कसरत करून तिने हे यश संपादन केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे. पूजाला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला. एक वेळ स्वयंपाक राहू दे मात्र अभ्यास कर, असं तिच्या पतीने ठणकावून तिला सांगितलं. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असं पूजाने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९०० पैकी ५७०.२५ गुण मिळवत पूजा राज्यात मुलींमध्ये अव्वल आली आहे. शैक्षणिक आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या पूजाला आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास आधीपासूनच होता. तो खऱ्या अर्थाने एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण करत तिने सत्यात उतरवला आहे. आठव्या वेळी ती यश संपादन करू शकली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वच्छ तीर्थ अभियान’

लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना पूजा म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. अनेक वर्षांच्या कष्टाचे चीज झाले आहे. माझ्या कुटुंबात माहेरी वडील शेती करतात तशी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. २०१५ मध्ये ठरवलं होतं की आपण एमपीएससी करायची. मी अधिकारी होऊ शकते असा मला विश्वास होता.

हेही वाचा : पिंपरी : जाहिरात फलक दिसत नसल्याने झाडांवर कुऱ्हाड, सात संस्थांचे परवाने रद्द, गुन्हे दाखल

पुढे ती म्हणाली, एमपीएससीमध्ये यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं हे तितकंच खरं आहे. ते माझ्या बाबतीत खरंही ठरलं. कोविड काळात स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या यशात कुटुंबाचा मोठा वाटा आहे. माझं लग्न झालेलं आहे. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. अनेक मुली लग्नानंतर शिक्षणाबाबतची स्वप्न तिथेच सोडून देतात. माझ्या बाबतीत मात्र पतीचे खूप सहकार्य मला मिळाले. माझे पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. घरात एक वेळ स्वयंपाक करू नकोस पण अभ्यास कर, असं पती नेहमी म्हणायचे असं पूजा म्हणाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad pooja vanjari tops mpsc exam in girls kjp 91 css