पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी दुकानदार या व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवरील कारवाईला विरोध सुरू केला आहे. कारवाईला विरोध करण्यासाठी देहू- आळंदी रस्ता बंद केला आहे. पोलीस दाखल झाले असून व्यावसायिकांची समजूत काढण्याचे काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. या भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून आजूबाजूच्या रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला असल्याच्या तक्रारीही महापालिकेकडे आल्या आहेत. या भागातील रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्लास्टिक, कागद व इतर धाेकादायक कचरा जाळला जात असल्याने परिसरात विषारी वायू निर्माण होत आहे. परिणामी, वायू प्रदूषणात भर पडत आहे.

महापालिकेने चिखली, कुदळवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदाम तसेच, हॉटेल, बेकरी, पत्राशेड, वर्कशॉप अशा अनधिकृत असलेल्या पाच हजार अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटीसा दिल्या आहेत. १५ दिवसांत अनधिकृत पत्राशेड बांधकाम काढून घ्यावे. अन्यथा बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाकडून ते पाडण्यात येईल, असा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला होता. व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेनेही उत्तर दाखल केले आहे.

बांधकाम काढण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपलेल्या अनधिकृत आस्थापनावर महापालिकेने कारवाईची भूमिका घेतली. याबाबत पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्रही दिले. बुधवारी कारवाई करणार असल्याचे परिसरात जाहीर करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी कारवाई केली जाणार होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याचे समजताच व्यावसायिकांनी देहू- आळंदी रस्ता बंद केला आहे. पोलीस दाखल झाले असून व्यावसायिकांची समजूत काढण्याचे काम सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad rasta roko by shop owners to oppose anti encroachment drive at kudalwadi chikhali pune print news ggy 03 css