पिंपरी -चिंचवड : अजित पवारांचा भाजपा मधील वट कमी झाला असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभेला अजित पवार यांना केवळ चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. रोहित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील पक्ष कार्यालयाला भेट दिल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचा भाजपामध्ये वट आहे, असं वाटत होतं. पण आता असं काही वाटत नाही. कारण त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा वट राहिला नाही. त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत आहेत. विधानसभेला देखील त्यांना वीस जागा मिळतील किंवा तुम्ही तुमच्या चिन्हावर लढू नका भाजपच्या चिन्हावर लढा, असं सांगितलं जाईल. लढायचं असेल तर वेगवेगळं लढा अशी परिस्थिती होणार आहे. लोकसभेला भाजपाला दोन्ही पक्षांची गरज आहे. तरीही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी केले जात आहे. लोकसभेनंतर त्यांची किंमत काय होईल ते सांगता येत नाही.
हेही वाचा : पिंपरी : महापालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे? नेमक्या बचत ठेवी किती? आयुक्त म्हणाले…
रोहित पवार पुढे म्हणाले, पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत काहीही होऊ शकतं. राज्यसभेत त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती असं कळलं. लोकसभेला ते उभे राहणार आहेत. शिरूरमध्ये शक्यता कमी आहे. बारामती आणि नगर येथून त्यांना उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. युगेंद्र पवार यांच्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, युगेंद्र काय निर्णय घेतो ते महत्वाचं आहे. तो शरद पवार म्हणजे त्याच्या आजोबांना सहकार्य करत असेल तर चांगली गोष्ट आहे. युगेंद्र हा शरद पवार यांना साथ देत असेल तर त्याचं स्वागत आहे. शरद पवार यांनी अजित पवारांसाठी काय केलं हे आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही. अजित पवार हे काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही.
हेही वाचा : पिंपरी : महापालिकेचा ८ हजार ६७६ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; करवाढ, दरवाढ आहे का? वाचा सविस्तर…
दरम्यान रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर देखील मत व्यक्त केले. “मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आरक्षण आलं आहे. लोकसभेला डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे आरक्षण टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या तोंडून आलेला ‘प्रयत्न’ हा शब्द भीतीदायक आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा शब्द घातक आहे”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.