पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन विभागवार होणार असले तरी मुख्य उद्घाटन सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. त्यानिमित्त सहा आणि सात जानेवारीला शहरातील नाट्यगृहांमध्ये बहुरंगी कार्यक्रमांची रेलचेल असून ६४ नाट्यकलांचा सहभाग असल्याची माहिती परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत समिती अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहेत. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात शरद आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
हेही वाचा : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुणे दौऱ्याचा असाही फायदा
मुख्य संमेलन चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगणावर होणार आहे. नाट्यदिंडी, शोभायात्रेने संमेलनास सुरुवात होईल. नाट्यदिंडीमध्ये लोककलांचे सादरीकरण केले जाणार आहे. नाट्य क्षेत्रामध्ये कार्यरत नाट्यकालावंतांचा सहभाग यामध्ये असेल. शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या चिंचवड येथील मैदानावर बालरंगभूमीद्वारे नाट्य सादरीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेही वाचा : डॉक्टरने केला विश्वासघात! गुंतवणुकीच्या नावाखाली केली करोडो रुपयांची फसवणूक
संमेलनामध्ये व्यावसायिक नाटके, राज्यस्तरीय हौशी स्पर्धेत गाजलेले नाट्यप्रयोग, प्रायोगिक नाटके, नाट्यछटा एकपात्री प्रयोग, एकांकिका, कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणी सम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्य विषयक कार्यक्रम, बालनाट्य, महाराष्ट्रातील स्पर्धांमध्ये नावाजलेल्या उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरांमधील आबाल वृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी असल्याचे भोईर म्हणाले.