पिंपरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात गद्दारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. मावळची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला सुटणार हे ठरले नसले, तरी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीकडून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, महाविकास आघाडीकडून मावळ मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. बारणे आणि वाघेरेंमध्ये गद्दारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोघांनीही पक्ष बदलले आहेत. बारणे हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत, तर वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरी : चिंचवडमध्ये भाजपच्या जाहिरातीला काळे फासले

खासदार बारणे यांनी गद्दारी केली. मावळमधून गद्दाराला पाडणारच, असा निर्धार वाघेरे यांनी केला. ते कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात आले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. आम्ही तत्त्वांसाठी पक्ष सोडला. आम्ही सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. तसेच दहा वर्षांत खासदारांनी मतदारसंघात एकही काम केले नसल्याचा आरोप वाघेरे यांनी केला. वाघेरे यांच्या आरोपाला खासदार बारणे यांनीही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. बारणे म्हणाले, की मला गद्दार म्हणणारे वाघेरे कोणत्या पक्षातून, कोणत्या पक्षाशी गद्दारी करून आले हे सर्वांना माहीत आहे. ज्या व्यक्तीचा मावळ मतदारसंघात थांगपत्ता नाही, अशा व्यक्तीवर मी बोलणार नाही. पक्षनिष्ठेबाबत वाघेरेंनी मला सांगू नये असे म्हणत बारणे यांनी वाघेरे यांच्याबाबत अधिक भाष्य करणे टाळले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad shrirang barne and sanjog waghere accusing each other on the issue of traitor pune print news ggy 03 css