पिंपरी चिंचवड : तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
हेही वाचा : पिंपरी: महापालिका आयुक्त सल्लागारावर मेहरबान; दुसऱ्यांदा मुदतवाढ, तीन कोटी उधळणार
यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामधून काल रात्रीच्या सुमारास १० रुग्णांना उपचारासाठी पाठविण्यात आले. त्या उपचारादरम्यान आज सकाळी एक आणि दुपारच्या सुमारास एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित ८ रुग्णांच्या फुप्फुसाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.