पिंपरी : वाहतूक पोलीस, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहरातील वाहतूककोंडीबाबत रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २६ चौक निश्चित करण्यात आले आहेत. या २६ चौकांतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, अवजड वाहनांचे मार्ग बदलणे, रस्ते रुंदीकरण करून घेणे अशा उपाययोजना सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
पोलीस आयुक्त चौबे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांशी संवाद साधला. शहरात गुंडगिरीचा त्रास होत आहे का, सार्वजनिक मंडळांबाबत काही तक्रारी आहेत का, अशा अनेक गोष्टींवर आयुक्तांसोबत नागरिकांनी चर्चा केली. नागरिकांनी वाहतूककोंडीबाबत अनेक समस्या पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. कोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत सूचनाही केल्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाहतूककोंडी का होते, पोलीस काय काम करतात, रस्त्यांची अवस्था, बेशिस्त वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे अशा सर्वच गोष्टी सांगत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
हेही वाचा : पिंपरी : रक्षक चौकातील भुयारी मार्गासाठी ४० झाडांवर कुऱ्हाड
शहरातील प्रत्येक परिसरात वाहतूककोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी आपण काय उपाययोजना करत आहात, असे प्रश्न काही नागरिकांनी विचारले. काही नागरिकांनी थेट वाहतूककोंडी होणाऱ्या परिसराची माहिती देत छायाचित्र पाठवून आयुक्तांना प्रश्न विचारले. एका नागरिकाने वाकडमध्ये होणाऱ्या कोंडीबाबत विचारणा केली होती. त्यावर पोलीस आयुक्तांनी संबंधित परिसरात कोंडी का होते, यामागील कारणमीमांसा करत वाहतूक पोलिसांकडून काय उपाययोजना सुरू आहेत, याची माहिती दिली. शहरात वाहतूक नियंत्रण दिव्यांच्या (सिग्नल) नियमांचे पालन न करणाऱ्या किती चालकांवर कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती देण्यात आली.