पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार गट आणि काँग्रेस विरोधात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर किंवा काँग्रेस ने उमेदवार दिल्यास त्यांच काम आम्ही करणार नाही. भोसरी आणि पिंपरीत मशाल चिन्हच हवं असा आग्रह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत धरला. या बैठकीला शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आकुर्डीमधील शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीत मावळमध्ये संजोग वाघेरे यांचं शरद पवार गट आणि काँग्रेसने काम केलं नसल्याची खदखद बोलून दाखवत भोसरीमध्ये अमोल कोल्हे यांना शिवसैनिकांनी चांगलं लीड देत काम केल्याचा दाखला दिला आहे. उद्या तिकीट कुणालाही द्यायचं आणि आम्ही काम करायचं हे आता जमणार नाही. अस परखड मत शिवसैनिकांनी मांडल.
हेही वाचा…गुंडा विरोधी पथकाने गुंडांची दहशत मोडली; गोळीबार करणारी टोळी जेरबंद,७ पिस्तुल जप्त, धिंडही काढली
नेमकं शिवसैनिक काय म्हणाले?
शरद पवार गट आणि काँग्रेस ने आपल्याला म्हणावी तशी मदत केली नाही. लोकसभेत आपल्या उमेदवाराला शरद पवार गट आणि काँग्रेस ने मदत केली नाही. भोसरीमधून तुतारीचं काम आम्ही केलं त्यांना चांगलं लीड दिलं. भोसरीमध्ये मशाल चिन्हावरीलच उमेदवार हवा, तुतारी दिल्यास आम्ही काम करणार नाहीत. उमेदवार कुणीही द्या पण तो मशाल चिन्हावरील हवा असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार गटाचा एक ही माणूस बूथवर नव्हता. उद्या उमेदवारी तिकीट कुणालाही द्यायचं आणि आम्ही दिवसरात्र राबायच हे जमणार नाही. शरद पवार गट आणि काँग्रेस च आम्ही काम करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यांच्यामुळे आपण एक जीव काम केलं. मावळमध्ये शरद पवार आणि काँग्रेस काम केलं नाही. (हा उल्लेख पुन्हा- पुन्हा शिवसैनिकांनी केला) तेच भोसरीमध्ये बघितलं तर शिवसेनेने ताकदीने काम केलं होतं. तशी ताकद शरद पवार गट आणि काँग्रेस ने लावली नाही.