पिंपरी : ‘लाेकसभा निवडणुकीनंतर लव्ह, लँड, व्हाेट जिहादसारखे विषय समाेर यायला लागले. व्हाेट जिहादच्या भरवशावर लाेकसभा जिंकलाे, विधानसभादेखील जिंकू, असे सांगण्यात आले. त्या वेळी आता जर आपण जागे झालाे नाही, तर पुढचा प्रहार राजसत्तेवर नसून, धर्मसत्तेवर, विचारांवर आहे, हे ओळखून विधानसभा निवडणुकीपूर्वी गावाेगावी संतांनी जागरण केले. आम्ही सगळे एक आहाेत, असा भाव तयार केला,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच, ‘धर्मसत्तेने निरपेक्ष भावनेने लाेकांमध्ये जागरण केले आणि त्या जागरणातून पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली,’ असेही ते म्हणाले. मोशी येथील आयोजित वेदश्री तपोवन येथे संत कृतज्ञता संवाद सोहळ्याला फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. स्वामी गोविंद देवगिरी महाराज, मारुती महाराज कुरेकर, भास्कर गिरी महाराज या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : पुणे : ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लाेकसभेच्या निवडणुकीनंतर देशामध्ये अराजकता कशी तयार करता येईल, अशा प्रकारचे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न झाला. यात काही देश आणि परदेशांतील लोकांनी एकत्र येऊन हा देश बलशाली हाेऊ नये, यासाठी प्रयत्न केले. भारताजवळ बल आणि विचारही आहे. या दाेन्ही आधारांवर हा देश खूप माेठा हाेईल. त्यामुळे लाेक चिंतातुर हाेते. ‘व्हाेट जिहाद’चा विषय मांडून आमच्या विचारावर कसे आक्रमण करता येईल, यासाठी प्रयत्न हाेताना दिसले. जेव्हा जेव्हा सनातन धर्म, विचार कमजाेर झाला त्या त्या वेळी आम्ही गुलामगिरीत गेलाे आणि ज्या वेळी संतांनी धर्मजागरण केले, समाजजागरण केले, भिंती ताेडून टाकल्या, एकसंध समाज उभा केला, त्या त्या वेळी दिग्विजयी भारत पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, राजसत्तेने आपली भूमिका याेग्य पद्धतीने निभावली नाही, स्वार्थासाठी तडजाेडी केल्या, त्या त्या वेळी देशात धर्मसत्ता उभी राहिली. त्या धर्मसत्तेने निरपेक्ष भावनेने लाेकांमध्ये जागरण केले आणि त्या जागरणातून पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली.’
हेही वाचा : गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला, मोहोळच्या साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त
‘देशाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली. त्या वेळी पथभ्रष्ट राजसत्तेला हटवून त्या ठिकाणी धर्माचे आचरण करणारी राजसत्ता बसविण्याचे काम धर्माचार्यांनी केले. म्हणूनच या देशाला, विचाराला, संस्कृतीला कधीही काेणी संपवू शकले नाही,’ असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘आपल्या विचारांवर चालणारा मुख्यमंत्री होण्यासाठी संतांनी काम केले. समाजातील श्रद्धा कायम ठेवण्याचे काम संतांनी केले. संतांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. चुकलो तर मार्ग दाखविण्याचा संतांचा अधिकार आहे.’
स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, ‘सेवा करण्याची संतांची वृत्ती असल्याने हे राष्ट्र उभारले आहे. अखिल भारतीय विचार करणारे लोक महाराष्ट्रात आहेत, असे इंग्रजी साहित्यिकांनी लिहिले आहे. शिवरायांची कथा संतांनी सांगायला सुरुवात केली, की देशात तेज निर्माण होईल.’