पिंपरी : बाकी सर्व सहन केले जाईल. पण, बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवावे. बाकीच्या कशाचाही नाद करा, पण, लाडकी बहिण योजनेच्या विषयात नाद करु नका, हे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना सांगतो, असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. तसेच सावत्र, कपटी भावांवर मात करुन, अनेकांना पुरुन उरलो असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडीत करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणांसाठी योजना सुरु केल्यानंतर विरोधकांना लाडक्या भावांबाबतचे प्रेम आले. हे प्रेम कधीच नव्हते. प्रेम असते तर भाऊ, सहकारीही सोडून गेले नसते. लाडक्या बहिणीच्या रुपाने लाखो बहिणी मिळाल्या. बहिणींची माया, आशिर्वाद माया, प्रेरणा, उर्जा देणारे आहेत. संघर्ष करुन आम्ही इथपर्यंत आलो आहोत. या शक्तीच्या जोरावार अनेकांना पुरुन उरलो आहोत. सावत्र, कपटी भावांवर मात करुन आलो आहे. त्यांना त्यांची जागा दाखवा. ही योजना कशी बारगळेल, फसेल, पंधराशे रुपयांमध्ये महिलांना विकत घेता का, असे काहीही विरोधक बोलत आहेत. बहिणींबद्दल असे शब्द काढताना मनाची नाहीतर जनाची लाज त्यांना वाटली पाहिजे. योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सावत्र भावांना संधी आल्यावर जोडा दाखवा.
हेही वाचा : Eknath Shinde : “…तर गाठ माझ्याशी आहे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज, उद्या, परवा पडणार असे दावा करत होते. परंतु, सरकार टिकले नाही तर अधिक मजबूत झाले. देव पाण्यात बुडवून ठेवणा-यांचे जे काही व्हायचे ते झाले. मुख्यमंत्री झाल्यापासून एकही दिवस घरी थांबलो नाही. केवळ तोंडाला फेस येईपर्यंत फेसबुकवरुन बडबड केली नाही. झेंडू बामपण कमी पडेल असे दुखणे विरोधकांना झाले आहे. हे देणारे सरकार असून घेणारे नाही. आम्ही देत राहणार आहोत. दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा अहेर मिळणार आहे. विरोधकांसाठी दीड हजारांची रकमे किरकोळ असेल कारण त्यांनी गरिबीचे चटके कधी सोसले नाहीत. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. एक रुपया तरी महिलांच्या खात्यावर टाकला का, काँग्रेसचे सरकार असते तर महिलांच्या खात्यावर पंधरा रुपयेही आले नसते. परंतु, आम्ही थेट खात्यात पैसे टाकले. कट, भ्रष्टाचार ही महायुतीची संस्कृती नाही, असेही मुख्यंमत्री म्हणाले.
हेही वाचा : पुणे: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल
“योजनेची विरोधकांना वाटते भिती, बहिणींनो काळजी करु नका, तुमच्यासोबत आहे महायुती”
देव मंदिरात, देवाहा-यात नाही. माणसात देव आहे. यावर माझा विश्वास आहे. देण्याची दानत आमच्याकडे आहे. सावत्र भावांकडे लक्ष देऊ नका, त्यांनी करोनातही रुग्णांच्या तोंडची खिचडी पळविली. आनंदाच्या शिधाविरोधातही न्यायालयात गेले. कुठे फेडणार आहेत हे पाप. ही योजना अशीच चालू राहणार आहे. सरकारला आशिर्वाद दिले तर दीड हजारांचे दोन, अडीच, तीन हजार होतील. त्यापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली. तर, देताना कधी हात आखडता घेणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd