पिंपरी : नारळ पाणी विक्रेता असलेल्या दोन सख्या भावांनी साथीदारांसोबत पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचेच अपहरण केले. अपहृत घरमालकाला थेट विमानाने झारखंड येथे नेऊन गंगा नदीपात्रातील एका बेटावर डांबून ठेवले आणि मुलाला फोन करून एक कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या मदतीने अपहृत घरमालकाची सुखरूप सुटका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोदे वस्ती, वाकड येथील ५५ वर्षीय अपहृत व्यक्तीची सुटका करण्यात आली. नसीम मनीरुल हक अख्तर (वय २०, रा. पश्चिम बंगाल) लल्लू रुस्तम शेख (वय ४५, रा. साहेबगंज, झारखंड), साजीम करिम बबलू शेख (वय २०, रा. मालदा, पश्चिम बंगाल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ७० हजार रूपये किमतीचे पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले. तर, रेजुल करिम बबलू शेख याच्यासह तीन आरोपी गंगा नदीत उडी मारुन पळून जाण्यास यशस्वी झाले. याबाबत अपहृत व्यक्तीच्या मुलाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपचे काम न करण्यावर ठाम तर भाजपने दिला ‘हा’ इशारा

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहृत व्यक्तीच्या अनेक खोल्या भाड्याने आहेत. साजीम, रेजुल नारळ विक्रेता असून त्यांच्या खोलीत भाडेकरू म्हणून राहतात. वडील १७ ऑक्टोबर पासून घरी नसून वडीलांच्या मोबाइलवरुन एकाने फोन करून एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास तसेच पोलिसांकडे गेल्यास वडीलांना जीवे मारु, अशी धमकी दिल्याचे त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले. तपास करीत असताना अपहरण झालेल्या व्यक्तीला पर्यटनाच्या बहाण्याने त्यांचा भाडेकरू असणारा नारळ पाणी विक्रेता साजीम विमानाने कोलकाता येथे घेवून गेल्याचे निष्पन्न झाले. पुणे विमानतळावरील कोलकत्त्याला जाणार्‍या विमानातील प्रवाशांची माहिती घेवून, ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ तपासून संशयीत व्यक्तींची माहिती प्राप्त करण्यात आली. पोलिसांचे एक पथक अपहृत आरोपींचा शोध घेण्याकरीता झारखंड व पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले.

हेही वाचा : मावळमध्ये आमदार सुनील शेळके, भाजपमधील वाद फडणवीसांच्या दरबारात

दरम्यान, त्यांच्या मुलाला आरोपी वडीलांच्या फोनवरुन एक कोटी लवकर जमा कर, पोलिसांकडे गेल्यास, काही गडबड केल्यास तुझ्या वडीलांना ठार मारु, अशी धमकी देवून रात्री दहापर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो असे सांगून, फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सांयकाळी साडेसात वाजता आरोपींनी फोन करुन, पैसे किती जमा झाले. अर्धा तासात पुणे रेल्वे स्थानक येथे घेवून ये. असे कळवून फोन बंद केला. मुलाला सतत खंडणीच्या पैशाकरीता फोन येत असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यांनी पोलीस अधिक्षक, मालदा, (पश्चिम बंगाल) व साहीबगंज (झारखंड) यांच्याशी संपर्क करुन, दाखल गुन्ह्याबाबत माहिती देवून तपासात मदत करण्याबाबत कळविले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने झारखंड पोलिसांच्या मदतीने अंधरात आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खो-यात गंगा नदीतून बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करून माग काढला. गंगा नदी पात्रात गोलढाब बेटावर छापा मारून पहाटे पाच वाजता अपहृत व्यक्तीची सुखरुप सुटका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri coconut seller kidnapped home owner by airplane to island for extortion pune print news ggy 03 css