पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या ११९० सदनिकांच्या प्रकल्पांचे केवळ २० टक्के काम झाले असताना अर्ज मागविण्यात आले आहेत. शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी करून लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहेत.

महापालिका हद्दीतील रहिवाशांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असावे. अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी. चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी व आकुर्डी प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या, परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात. दिव्यांगांसाठी पाच टक्के आरक्षण असेल. ऑनलाइन अर्जासोबत दहा हजार रुपये अनामत रक्कम, तसेच ५०० रुपये नोंदणी शुल्क असे दहा हजार ५०० रुपये ऑनलाइन स्वीकारण्यात येतील. सदनिकांच्या सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम परत करण्यात येईल.

हेही वाचा : आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे

डुडुळगावातील पंतप्रधान आवास योजनेसाठी https://pcmc.pmay.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले. अर्ज भरण्यासाठी २०२३-२४ आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, रद्द केलेला धनादेश, मतदान ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.

लाभार्थी हिस्सा १४ लाख

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५९५, अनुसूचित जाती १५५, अनुसूचित जमाती ८३, इतर मागास प्रवर्गासाठी ३५७ सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सदनिकांची किंमत १६ लाख ६४ हजार १७३ रुपये असणार आहे. केंद्र सरकारचे प्रतिसदनिका १ लाख ५० हजार तर राज्य सरकार एक लाखांचे अनुदान देणार आहे. लाभार्थ्यांना १४ लाख १४ हजार १७३ रुपये प्रती सदनिका स्वहिस्सा भरावा लागणार आहे.

हेही वाचा : पिंपरी : अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ; २६ व्यावसायिक मालमत्तांना टाळे

डुडुळगाव पंतप्रधान आवास योजनेत पाच इमारती आहेत. एका मजल्यावर चार सदनिका असणार आहे. आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत कामाची मुदत असल्याचे सह शहर अभियंता विजय काळे यांनी सांगितले.