पिंपरी : निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाच घुसखोरांच्या सुटकेसाठी पिंपरी न्यायालयात बनावट टजामीन देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकिलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बबन बनसोडे (वय ३४, रा. लांडेवाडी पोलीस चौकी शेजारी, विठ्ठलनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी हजर असलेले वकील आणि आरोपीच्या जामिनासाठी वकिलाच्या संपर्कात असलेले नातेवाईक व मित्र अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालय येथे घडली.
हेही वाचा : “मी…अजित आशा अनंतराव पवार, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”
पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींच्या सुटकेसाठी स्थानिक रहिवासी असणारा जामीनदार द्यायचा होता. मात्र जामीन देण्यासाठी उपस्थित असलेल्या वकिलासह इतर आरोपींनी बनसोडे हे स्वतः न्यायालयात हजर नसतानाही त्यांच्या आधारकार्डाचा वापर करीत आरोपींना जामीन देऊन न्यायालय व फिर्यादी यांची दिशाभूल करुन फसवणूक केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.