पिंपरी : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करून आणि जमीन लिहून दिल्यानंतरही वाढीव पैशांसाठी सावकारांनी तगादा लावल्याने एकाच कुटुंबातील तिघांनी झाेपेच्या गाेळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वडिलांनी मुलाचा गळा दाबून खून केल्यानंतर दाम्पत्याने गळफास घेतला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी चिखली येथे घडली. याप्रकरणी पाेलिसांनी तीन सावकारांना अटक केली आहे.
धनराज वैभव हांडे (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, शीतल वैभव हांडे (वय ४१ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. वैभव मधुकर हांडे (वय ५०, सर्व रा. सोनावणे वस्ती, चिखली) हे बचावले. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष पांडुरंग कदम (वय ४८, रा. ताथवडे), संतोष दत्तात्रय पवार (वय ४९, रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद मेहबूब शेख (वय ३६, रा. मोई, खेड) यांना अटक केली आहे. वैभव यांच्याविरोधात मुलाच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चिखली पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडची ‘कचरा कोंडी’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीमुळे महापालिका अडचणीत
हांडे यांनी व्यवसायासाठी कदमकडून सहा लाख, पवारकडून दाेन लाख रुपये दहा टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. शेख याच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. हांडे यांनी कदमला रकमेची परतफेड म्हणून नऊ लाख ५० हजार रुपये दिले. तसेच एक एकर जमीनही लिहून दिली होती. पवारला व्याजाचे दरमहा २० हजार रुपये देऊन २० गुंठे जमीन लिहून दिली होती. त्यानंतरही पवारने १४ लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असे सांगितले. शेख यालाही कर्जापोटी व्याज म्हणून चार लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी व्याजाचे पैसे देण्यासाठी हांडे यांच्याकडे तगादा लावला.
हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला. सावकारांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हांडे यांनी मुलगा धनराजचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती-पत्नीने छताच्या पंख्याला गळफास घेतला. त्यात शीतल यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हांडे यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे पाेलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले.
हेही वाचा : शालेय मंत्र्यांची पिंपरी- चिंचवड मधील शाळेला अचानक भेट; शिक्षकांची उडाली धांदल!
भावाला चिठ्ठी
शीतल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ठाण्याला राहणारा भाऊ अमित गाढवे यांना मोबाइलवर सुसाइड नोट (चिठ्ठी) पाठविली होती. भावाने चिठ्ठी पाहताच चिखली पोलिसांना दूरध्वनी केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलीस घरात गेले असता धनराज खाटेवर पडला होता, तर शीतल आणि वैभव हे लटकलेल्या अवस्थेत होते. दोघांनाही खाली उतरवले असता वैभव यांचा श्वास चालू होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर ते शुद्धीवर आले. मुलाचा गळा आवळून खून केल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तीन सावकारांना अटक केली आहे. फिर्यादीच्या विरोधात मुलाच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.