पिंपरी : शहरातील निगडी, प्राधिकरण येथील संत कबीर उद्यान परिसरात आज (रविवारी) सकाळी बिबट्याने शिरकाव केला होता. लोकवस्तीत बिबट्याने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.

प्राधिकरण येथील संत कबीर उद्यान परिसरात सकाळी दोन बिबटे दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. मात्र या परिसरात एकच बिबट्या आढळून आला आहे. एका बंगल्यात हा बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर त्याने शेजारीच असलेल्या संत कबीर उद्यानात धाव घेतली. तेथे एका शेडमध्ये तो लपून राहिला होता. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्याकरिता वनविभागासह रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी दाखल झाली होती. त्यांनी तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Story img Loader