पिंपरी : काही वर्षांपूर्वी भारताला रॉकेट, गोळी, बंदुकीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणली. भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका, स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ लढाऊ विमान, ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर संरक्षण दलात दाखल झाले आहे. संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये भारत आत्मनिर्भर झाला असल्याचा दावा संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी सोमवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाकण येथील निबे कंपनीच्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादन कारखान्याचे भट यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, नौदलप्रमुख आर. हरिकुमार, कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बाळकृष्ण स्वामी, गणेश निबे, राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…शिक्षक भरतीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत देखरेख

भट म्हणाले की, रॉकेट, बंदुक, गोळीची दुस-या देशाकडे मागणी करावी लागत होती. भारतीय बनावटीचे बुलेट प्रूफ जॅकेट देखील नव्हते. त्यामुळे मागणारा देश म्हणून भारताची ओळख होती. २६ जानेवारीच्या संचलनात सलामी देणाऱ्या तोफाही भारतीय बनावटीच्या नव्हत्या. गेल्यावर्षी भारतीय बनावटींच्या तोफांची सलामी दिली गेली. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण उद्योग (एमएसएमई) तयार झाले.

खासगी, सरकारी कंपन्याही संरक्षण सामग्रीची निर्मिती करत आहेत. दर्जेदार उत्पादन असलेल्या खासगी कंपन्यांची सामग्री ही सरकार खरेदी करणार आहे. आता परदेशातील लोक खरेदीसाठी भारतात येत आहेत. संरक्षण सामग्री विदेशात पोहचविणाऱ्या २५ देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. संरक्षण उत्पादन करणाऱ्या कंपन्या तोट्यात नसून नफ्यात आहेत. प्रत्येक गोष्टीत भारत आत्मनिर्भर बनत आहे. जगभरात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पाकिस्तान बॉम्ब मारण्याची धमकी देता होता. आज पाकिस्तानात प्रंचड महागाई वाढली. आपल्या देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाते.

हेही वाचा…पुणे : वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

सामंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुणे जिल्हा आहे. महाराजांच्या जयंतीदिनी संरक्षणाचे उत्पादन करणारे दालन सुरू होत आहे, हे अभिमानास्पद आहे.

तिन्ही सुरक्षा दलात भारत ताकदवान

लष्कर, नौदल, हवाई दलामध्ये मोठी हिंमत आणि शक्ती आहे. केवळ संसाधनाची आवश्यकता होती. आता देशात संरक्षण संसाधनाचे उत्पादन होत आहे. तिन्ही सुरक्षा दलात भारत ताकदवान आहे. संरक्षण विभागावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारताचा समावेश आहे, असेही भट यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri minister of state for defence ajay bhatt claims india become atmanirbhar in defense material production pune print news ggy 03 psg