पिंपरी : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार आयोजन करावे. शासन आणि महापालिकेकडून या संमेलनासाठी सहकार्य केले जाईल. नाट्य परिषदेला शासनाकडून मिळालेल्या निधीतून ज्येष्ठ कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा आरोग्य विमा काढण्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे उद्योगमंत्री, संमेलनाचे मुख्य निमंत्रक उदय सामंत यांनी सांगितले. राज्यात राजकीय परिस्थिती कितीही उलटसुलट असली तरिही नाट्य संमेलनासाठी सर्वपक्षीय एकत्र राहणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वागताध्यक्ष म्हणून बोलविले आहे, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी चिंचवड येथील कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर उभारण्यात येणाऱ्या बालनगरी मंडपाचे पूजन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे सहा आणि सात जानेवारी रोजी पार पडणार आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या मंडप उभारणी आणि सजावटीच्या कामाची पाहणीदेखील त्यांनी केली. आमदार उमा खापरे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : कपड्याच्या दुकानाच्या माहितीपत्रकावरून लागला फरार सोनाराचा शोध; पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन असा लावला छडा

मंत्री सामंत म्हणाले की, नाट्य संमेलनाला गौरवशाली परंपरा असून शंभरावे नाट्यसंमेलन पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत होत आहे. नाट्य संमेलनाच्या माध्यमातून नाट्य चळवळीला गती मिळते. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी विविध क्षेत्रातील कलाकारांसह पडद्यामागील कलाकारांचादेखील मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात पाहायला मिळते. नाट्य संमेलन हा केवळ सोहळा नसून ती एक चळवळ आहे. सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा नाट्य संमेलनाने जपली आहे. ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात या नाट्य संमेलनाचे आयोजन करावे. शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यांना प्रोत्साहन द्यावे. नाट्य परिषद आणि शासनाकडून संमेलनासाठी आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा : सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी; नाताळानिमित्त लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

“राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वपक्षीय या नाट्यसंमेलनाचे नियोजन करीत आहोत. नाट्य संमेलन ही एक सांस्कृतिक चळवळ आहे, अशा भावनेतून आम्ही याकडे पाहतो. हे नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी सहकार्य करावे.” – उदय सामंत, मुख्य निमंत्रक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri minister uday samant said all parties will unite for 100 th marathi natya sammelan pune print news ggy 03 css