पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केल्याची घटना दिघी येथे घडली. संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. दिघी रोड, मुळ – वाशिम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे (रा. दिघी, मुळ – वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खंदारे तीन महिन्यापूर्वी कामानिमित्त गावावरून दिघी येथे राहण्यास आले होते. खंदारे आणि खंडारे दोघेही बांधकाम साइटवर मिस्त्रीचे काम करत होते. रविवारी सुट्टी असल्याने दोघेही घरी होते. त्यामुळे त्यांनी बिर्याणी बनवण्याचा बेत आखला.
हेही वाचा : Cyber Crime : इंस्टाग्रामवरील जाहिरातीवर क्लिक करणं पडलं महागात, ७१ लाखांची फसवणूक… रशियन आरोपीला अटक
आरोपी गणेश याने बिर्याणी बनवली. मात्र ती चांगली झाली नाही, असे म्हणत मयत खंदारे यांनी खंडारे याच्याशी वाद घातला. त्यावरून दोघांच्यात हाणामारी झाली. यावेळी खंडारे याने खंदारे यांच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी घातली. यामध्ये खंदारे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे तपास करीत आहेत.