पिंपरी: पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मंत्रीपदासाठी माजी नगरसेवकांसह बैठक घेऊन लॉबिंग केली. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून पिंपरी- चिंचवड शहराला मंत्रीपद नाही. यामुळे अण्णा बनसोडे यांची शिफारस करत असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे. पिंपरी- चिंचवड मधील हॉटेलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी बैठक घेऊन अण्णा बनसोडेंसाठी ठराव केला आहे. अण्णा बनसोडे हेदेखील मंत्रीपदासाठी आग्रही आहेत. माजी नगरसेवकांचा अजित पवार आदर करतील असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड मधील आमदारांना मंत्री पदाचे वेध; मंत्री पद एक, दावेदार तीन…तिघांमध्ये रस्सीखेच सुरू
शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, ४२ वर्षांपासून शहरात मंत्री पद नाही. या शहराची ३० लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. अण्णा बनसोडे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद द्यावं अशी आमची आग्रही मागणी आहे. यासाठी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पत्र देणार असून अजित पवारांना देखील मुख्यमंत्री करावं आणि अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद द्यावं यासाठी ही मागणी केली. अण्णा बनसोडे यांच्यासाठी अजित पवारांकडे आमची आग्रहाची मागणी आहे. सर्व माजी नगरसेवक मुंबईत अजित पवारांची भेट घेणार आहेत. यासाठी ही बैठक बोलावण्यात आली, तसा ठराव करण्यात आला आहे. अशी माहिती योगेश बहल यांनी दिली आहे. सर्व माजी नगरसेवक एकत्र आले आहेत. त्यांनी मला मंत्रिपद मिळावं म्हणून ठराव केला. या ठरावाचा अजित पवार आदर करतील आणि मला मंत्रिपद देतील असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.