पिंपरी- चिंचवड: राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांचा जाहीर निषेध केला आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला होता. यावरून आता महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाने पिंपरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निषेध करत प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना खास भेटवस्तू देत त्यांच्या डोक्यावर जिरेटोप चढवला होता. मात्र, या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.
हेही वाचा : पिंपरी : मतदानाला गेले आणि चोरट्याने घर फोडले
पिंपरीतील चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांचा जाहीर निषेध करत मूक आंदोलन केले आहे. याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी शरद पवार गटाने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. वारंवार भाजपकडून महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले जात आहेत. माजी राज्यपाल यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. अशी आठवण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी करून दिली आहे.