पिंपरी : शहरात सहा लाख २८ हजार मालमत्ता आहेत. त्यांपैकी पन्नास टक्के म्हणजेच तीन लाख नऊ हजार २३३ मालमत्ताधारकांनीच अडीच महिन्यांत ३६२ कोटी १२ लाख रुपयांचा करभरणा केला आहे. महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मालमत्ताकर हाच महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मागील पाच वर्षांत कोणतीही करवाढ केली नाही. त्याऐवजी महापालिकेने नवीन, वाढीव मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यांची नोंदणी करून कर कक्षेत आणले. करआकारणी व करसंकलन विभागाने चालू आणि थकीत करवसुलीवर भर दिला आहे. सिद्धी उपक्रमांतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना देयकांचे वितरण करण्यात आले. करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ताधारकांना विविध करसवलती देण्यात येत असून, या सवलतींची ३० जून मुदत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कर भरण्याकडे मालमत्ताधारकांचा कल असतो. महापालिकेच्या वतीने करसंकलनासाठी १७ विभागीय कार्यालये आहेत. तसेच ऑनलाइनही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रोखीने कर भरण्याकडे अनेकांचा कल आहे.
हेही वाचा…आशियाई देशांना जूनमध्ये तीव्र उन्हाळ्याचा अनुभव
महापालिकेने सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत करभरणा केंद्र सुरू ठेवली आहेत. त्यामुळे अडीच महिन्यांत तीन लाख नऊ हजार २३३ मालमत्ताधारकांनी ३६२ कोटी १२ लाख रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा केल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
हेही वाचा…ऑस्ट्रेलिया, टांझानियातून हरभरा आयात? तुटवडा कमी करण्यासाठी ११ लाख टन आयातीची शक्यता
सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू
कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून मुदत आहे. या कालावधीत दोन शनिवार आणि दोन रविवार अशा चार सुट्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सुटीच्या चारही दिवशी करसंकलन कार्यालयातील केंद्र सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहेत.