पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे पुन्हा निवडणूक लढविण्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड शहर अजित पवार गटाचा रविवारी काळेवाडीत मेळावा झाला. युवकच्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याला पार्थ पवार येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पार्थ पवार फिरकलेच नाहीत. मागील निवडणुकीत दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाल्यापासून एक-दोनदा अपवाद वगळता पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात फिरकलेच नाहीत. आता पार्थ यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने पार्थ खरंच निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का? अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे.
हेही वाचा : पिंपरीत पार्क केलेल्या २० दुचाकी जळून खाक; आग लावली गेली का? अद्याप आगीचे कारण अस्पष्ट
चव्हाण म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली लढाई ही आपल्याच लोकांसोबत असणार आहे. त्यामुळे पक्षाची आणि ज्येष्ठ नेत्यांची भूमिका काय आहे, शहर विकासाची दिशा काय आहे, या बाबी नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. अजित पवार यांनी विचारसरणी सोडली अशी टीका केली जाते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष भाजप आणि शिवसेने विरोधात लढला. निवडणुकीनंतर त्याच शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा वरिष्ठांनी निर्णय घेतला. त्यावेळी वरिष्ठांची भूमिका सर्वांनी मान्य केली. आता अजितदादांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली तर त्यात काहीही वावगे नाही. आगामी निवडणुकांमध्ये आपली लढाई आपल्याच लोकांसोबत आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.