पिंपरी : सशुल्क वाहनतळ धाेरण राबविण्यात अपयश आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता पुन्हा शहरातील उड्डाणपुलाखाली स्मार्ट सिटीअंतर्गत सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा, चिंचवड आणि निगडी या तीन ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळ सुरू केले जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियाेजन आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या आणि त्या लाेकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक काेंडीत भर पडत असून रस्तेही अपुरे पडत आहेत. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे तसेच, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहने उभी केली जातात. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येस तोंड द्यावे लागते. शहरातील नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत होणे व वाहनतळाची सुविधा उपलब्ध होणे या हेतूने महापालिकेने २०२१ मध्ये सशुल्क वाहनतळ धोरण आणले हाेते. यासाठी एका संस्थेची नेमणूक केली होती. ८० ठिकाणी वाहनतळ सुरू करण्याचे नियाेजन केले हाेते. पहिल्यात २० ठिकाणे निश्चित केली हाेती. मात्र, त्यातही फक्त १६ ठिकाणीच याेजनेची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, अधिकाऱ्यांची निष्क्रियता, राजकीय विरोध, पोलिसांचा असहकार, पोलिसांकडून वाहनांवर कारवाईस टाळाटाळ आणि दमदाटीचे वाढलेले प्रकार यामुळे महापालिकेने गाजावाजा करत आणलेले सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) धोरण एप्रिल २०२४ मध्ये गुंडाळावे लागले हाेते.
आता पुन्हा स्मार्ट सिटीअंर्तगत सशुल्क धाेरण राबविण्यात येणार आहे. या वेळी पदपथ, मोकळ्या रस्त्याऐवजी उड्डाणपुलाखालील माेकळ्या जागेत वाहनतळाचे नियाेजन केले आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील भारतरत्न जेआरटी टाटा उड्डाणपूल, चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपूल आणि निगडीतील मधुकर पवळे पुलाखाली सशुल्क वाहनतळ सुरू केले जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंमलबजावणीला सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियाेजन आहे. दुसऱ्या टप्प्यात डांगे चाैक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी येथील साई चाैक, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण माेरे प्रेक्षागृह, चापेकर चाैकात सशुल्क वाहनतळ धोरण राबविण्याचे नियाेजन आहे.
शुल्क किती?
दुचाकीसाठी एका तासाला पाच रुपये, चारचाकीसाठी दहा रुपये शुल्क
पहिल्या टप्प्यात तीन उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळ धाेरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात वाहनतळाच्या धाेरणाला सुरुवात करण्याचे नियाेजन आहे. त्यानंतर शहरातील उर्वरित ठिकाणी वाहनतळ धाेरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिकेचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.