पिंपरी : आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस राहिल्याने करसंकलन विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. त्या अंतर्गत एक लाखापुढील थकबाकीदारांची नावे रिक्षातून ध्वनिवर्धकाद्वारे जाहीर केली जाणार आहेत. तसेच मालमत्ता जप्तीच्या कारवाईची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित केली जाणार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी त्वरित थकीत आणि चालू कर भरून आपली कुप्रसिद्धी टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून करवसुलीसाठी महापालिकेचे १७ विभाग आहेत. आतापर्यंत ७७३ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे ३८ दिवस राहिले आहेत. त्यामुळे करवसुलीसाठी करसंकलन विभागाने मालमत्ता, नळजोड तोडण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत एक हजारहून अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर ४५१ मालमत्ता लाखबंद केल्या असून, १५१ मालमत्तांचे नळजोड तोडले आहेत. वारंवार कर भरण्याचे आवाहन करून आणि कर भरण्याची क्षमता असतानाही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे रिक्षातून ध्वनिवर्धकाद्वारे जाहीर केली जाणार आहेत. दैनिकांमधूनही थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. तसेच जप्त केलेल्या मालमत्तांपैकी २४ मालमत्तांचे मूल्यांकन ठरवून लिलाव समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यावर आठवड्याभरात निर्णय होणार आहे.

हेही वाचा : मनोज जरांगे आणि बारसकर महाराजांचा वाद हा वैयक्तिक, त्यात सरकारचा काडीमात्र संबध नाही – मंत्री उदय सामंत

रिल्स स्पर्धा

पिंपरी-चिंचवड शहरातील ७६ जणांचे समाजमाध्यमातील पाच हजारपेक्षा जास्त अनुसारक (फाॅलोअर्स) आहेत. नागरिकांना कर भरण्यासाठी प्रेरित करण्यासाठी या ७६ जणांमध्ये रिल्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात नावीन्यपूर्ण रिल्स करणाऱ्याला करसंकलन विभागातर्फे पारितोषिक देण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले की, शहरातील थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावली आहे. त्यानंतरही थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्याने मालमत्ता जप्ती, लाखबंद करणे, नळजोड तोडण्याची कारवाई केली जात आहे. थकबाकीदारांनी कर भरून जप्ती आणि लिलावासारखी कारवाई टाळावी.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri pcmc to announce names of residents who have not paid property tax on loud speaker pune print news ggy 03 css